Saturday, July 31, 2010

आवाहन

हिंद देशा शिकशील कधी रे, ही जगाची रिती
शौर्याच्या वामांगीच शोभती, मैत्री अन्‌ शांती


शौर्याविण जो हि बोलला, जगीं शान्तीची भाषा
त्यास स्वतःस मुळी न उरली, सन्मानाची आशा


शौर्याच्या कथांनी भरली, पाने इतिहासाची
आता देतो पहा उदाहरणे, तुझ्याच पुत्रांची


जरि कां भेकड असतां शिवबा, चुड़ामण ज़ाट
दिल्ली दरबारी वाचले असते, तयांनी शांतिपाठ
’औरंग्या’ने कां दिली असती, त्यांना सनद स्वराज्याची
अथवा देता, कां स्विकारली असती ऐसी भीक उपकाराची


कां प्रताप, मान लवुन शत्रुंपुढे असता गेला
कां शमल्या असत्या , त्याने वीरांगनांच्या जोहाराच्या ज्वाला
गवताच्या भाकऱ्या खाऊन जगला, तो राजपूत वीर
म्हणूनच गाती आज पवाडे, कवी अन्‌ शाहीर


कां, आले असतां, गनिम फोडण्या, देवीची मुर्ती
छत्रसाल नच गेला करण्या, तयांशी संधिपुर्ती
तलवार काढुनी, कापले त्याने, तत्क्षणींच शीर सात
म्हणून वंदण्या तयास जुळति, आज आपुले हात


’शांतिदूत’ हो वाचावा तुम्हीं, बलिदानाचा शीख-इतिहास
सुधरावे तुमचे तुम्हीच, आधि होण्या जगीं परिहास
"मयुरेश" विनवी भारत देशा, जागवी आपुले स्वत्व
शौर्याने सन्मान मिळवी, हेच शाश्वत तत्व.
                                                   
                                                          - Mayuresh S. Deshapnde

No comments:

Post a Comment